भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची अखेर आज घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा झटका बसला आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी,  ”मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

तर, मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभावतील, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपावासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले.आहे त्यामध्ये मुकुल रॉय यांचे नाव आघाडीवर होते. तसेच, रजीब बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला बसणार मोठा झटका!

मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपात प्रवेश केला होता. १९९८ पासून ते बंगालच्या राजकारणात आहेत.