पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपाच्या नव्या मुख्यालयाचे आज (रविवार) उदघाटन झाले. देशातील १८ राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या या पक्षाचे नवे कार्यालय आता ६, दीनदयाल उपाध्याय मार्ग येथे उभारण्यात आले आहे. पूर्वी हे कार्यालय ११, अशोक रोड येथे होते. भाजपाचे नवे कार्यालय हे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये नवीन मुख्यालयाचा शिलान्यास केला केला होता. मुंबईतील प्रमुख आर्किटेक्ट कंपनीने कार्यालयाचा आराखडा तयार केला होता. पक्षाच्या नव्या मुख्यालयात सर्वसुविधांनी युक्त अशा तीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतूनच देशातील विविध राज्यांशी समन्वय साधला जाणार आहे.

भाजपाचे नवे मुख्यालय हे २ एकर जमिनीवर उभारण्यात आले आहे. यामध्ये ४०० लोक बसतील इतकी क्षमता असलेली कॉन्फरन्स रूम, ऑफिस, सेमिनार रूम आणि स्क्रीनिंग रूम बनवण्यात आली आहे. त्याचबरोबर इमारतीत सोलर पॅनल आणि बायो टॉयलेटही उभारले आहे. त्याचबरोबर अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण इमारत ही कमळ या थीमवर साकारण्यात आली आहे. परिसरात कमळ ही थीम असलेल्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन मुख्यालयाच्या परिसरात लाल रंगाच्या तीन इमारती उभारल्या आहेत. पक्षाचे पदाधिकारी, सचिव आणि कार्यकर्त्यांसाठी खोल्या आहेत. त्याचबरोबर एक स्टुडिओ ही तयार करण्यात आला आहे. इथूनच विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांना सहभागी होता येईल. पर्यावरणाचा विचार करून हे मुख्यालय बांधण्यात आले आहे. परिसरातील सर्व ७० खोल्यांमध्ये वाय-फायची व्यवस्था आहे. तिनही इमारतींमध्ये कॉन्फरन्स हॉल, रिसर्च रूम, डिजिटल वाचनालय आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्थाही आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विविध पक्षांना आपले कार्यालय ल्युटियन झोनबाहेर हलवण्याची सूचना केल्यानंतर असे पाऊल उचलणारा भाजपा पहिला राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. भाजपाने आपले मुख्यालय इतरत्र हलवल्यामुळे आता इतर पक्षांनाही अशी कृती करण्यासाठी दबाव येऊ शकतो. कारण बहुतांश सर्वच पक्षांचे कार्यालये हे ल्युटियन झोनच्या बंगल्यातूनच चालतात. भाजपाचे कार्यालय अशोक रोडवर होते. तर काँग्रेसचे मुख्यालय हे अकबर रोडवर आहे. अमित शहा यांनी २०१४ मध्ये पक्षाचा पदभार सांभाळला होता. तेव्हापासून ते सर्व राज्यांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपल्या मालकीचे कार्यालय उभा करण्यात गुंतले आहेत. त्या दिशेने ते वेगाने काम करत आहेत.