सत्तेत येऊन आठवडा उलटत नाही तोच काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी जहाल दहशतवादी मसरत आलम याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचा (पीडीपी) सत्तेतील भागीदार भाजपने जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत तेढ निर्माण झाली आहे.
हुरियतचा नेता आणि जहाल दहशतवादी असलेल्या मसरत आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणे, दहशतवादी कारवाया करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा या दहशतवाद्याला तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने खोऱ्यात संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री सईद यांनी गेल्या बुधवारी काश्मीरच्या पोलीसप्रमुखांशी बैठक घेऊन ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, अशा सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी या आदेशाचे पालन करत शनिवारी आलमची सुटका केली. दरम्यान, भाजपच्या युवा मोर्चाने मुख्यमंत्री सईद यांच्या या निर्णयाला विरोध करत शनिवारी धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आलमच्या अटकेचे आदेश द्यावेत, अशी मागणी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली.  

काँग्रेसचा हल्लाबोल
काश्मिरात मोदींनी पीडीपीशी युती केली. त्यामुळे आलमच्या सुटकेच्या निर्णयात त्यांचाही वाटा आहे. मोदी, राजनाथसिंह आता गप्प का आहेत. काश्मीरमधील भाजप कोमात गेली का, असा सवाल करत काँग्रेसने भाजपवर टीका केली.

कोण आहे आलम?
हुरियतचे नेते सईद शाह गिलानी यांचा एकेकाळचा कट्टर समर्थक असलेल्या आलमने खोऱ्यात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. २००८ ते २०१० दरम्यान लष्कर व पोलिसांवर झालेल्या दगडफेक व हल्ल्यांच्या अनेक कारवायांमागे त्याचाच हात होता. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी दहा लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. जम्मू-काश्मीर पोलीस व सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवत ऑक्टोबर २०१० मध्ये त्याला अटक केली.

संघाचा सवाल :
काश्मिरातील निवडणुका शांततेत पार पडू दिल्याबद्दल पाकिस्तानचे व दहशतवाद्यांचे आभार मानणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद यांना ते भारतीय आहेत की नाही, असा सवाल करा असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकात व्यक्त करण्यात आले आहे. सीबीआयचे माजी संचालक जोगिंदरसिंह यांनी त्यांच्या लेखात सईद यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीकेचे असूड ओढले आहेत.