रायबरेलीच्या दौऱ्यावर असलेले भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीने फक्त घराणेशाही पाहिली आहे. त्यांनी विकास नाही पाहिलेला, असा टोला त्यांनी लगावला. ‘भगवा दहशतवाद’ या काँग्रेसच्या वक्तव्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. मक्का मशिद प्रकरणात त्यांच्या कामावर पाणी फेरले गेले आहे. आता तुम्हाला लोकांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. रायबरेली हा सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे.

काँग्रेसने मतपेटी मजबूत करण्यासाठी हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचे काम केल्याचे सांगत काँग्रेसने हिंदू दहशतवादप्रकरणी माफी मागायला पाहिजे की नाही, असा सवाल सभेला उपस्थित लोकांना केला. चार दिवस झाले आहेत. पण मतपेटीच्या राजकारणामुळे ते माफीही मागत नाहीत, असे ते म्हणाले.

आम्ही रायबरेलीला घराणेशाहीतून मुक्त करू. हे अभियान आजपासूनच आम्ही सुरू करणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे अनेक दशके सरकार होते. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि बसपाने राज्य केले. पण देशात अग्रेसर असलेले हे राज्य मागे पडत गेले. रायबरेलीसह उत्तर प्रदेशमधील अनेक गावं अद्यापही अंधारात होती. पण २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वांना वीज देण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर २०१७ मध्ये राज्यातील महान जनतेने आणखी एक जबाबदारी देत तुमची सेवा करण्याची संधी दिली, असे शाह म्हणाले.

योगी सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले, पूर्वी उत्तर प्रदेश देशभरात गुंडगिरी आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेसाठी ओळखले जात असत. पण योगी सरकार सत्तेवर आल्यापासून गुंडांनी पलायन केले आहे. मागील १५ वर्षांत राज्यातील शेतकरी आपला गहू, तांदूळ आणि ऊस घेऊन फिरायचा. भाजपा सरकार येताच ही समस्या सोडवण्यात आली. सरकारने किमान हमीभाव देण्यास सुरूवात केल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आमदार दिनेश सिंह यांनी आपल्या परिवारासह भाजपात प्रवेश केला. माजी आमदार अखिलेश सिंह काँग्रेसमध्ये आल्यापासून दिनेश सिंह हे नाराज होते. अखिलेश सिंह आणि दिनेश सिंह यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. अखिलेश सिंह पक्षात आल्यापासून दिनेश सिंह पर्यायाच्या शोधात होते. दिनेश सिंह भाजपात आल्याने हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जाते.