भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे.

मला स्वाइन फ्लू झाला आहे. ईश्वराची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छांमुळे मी लवकर बरा होईन असे अमित शाह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

अमित शाह यांना आज सकाळपासूनच बरे वाटत नव्हते. छातीमध्ये दुखत होते तसेच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास ते  तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी चाचणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांना शाह यांना दाखल करुन घेतले असून पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल अशी माहिती आहे.

अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाल्याचे समजताच केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा लखनऊहून दिल्लीला येण्यासाठी निघाले आहेत. दिल्लीत पोहोचताच ते तडक एम्स रुग्णालयात जाऊन शाह यांची भेट घेतील. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमित शाह आजारी पडले होते. आपला बंगळुरुचा दौरा अर्धवट सोडून त्यांना दिल्लीत परतावे लागले होते.

आज सकाळीच भाजपाचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. उपचारासाठी अरुण जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात येणार आहे.