निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण येते. दर पाच वर्षांनी निवडणूक जवळ आली की भाजपाकडून राम मंदिराचा मुद्दा उचलला जातो असा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. राम मंदिर आणि बाबरी मशीद वादग्रस्त प्रकरणाची सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टाने तहकूब केली. ही सुनावणी जानेवारी महिन्यात होईल असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भाजपाला फक्त निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराची आठवण येते असं म्हटलं आहे.

भाजपाला निवडणुका जवळ आल्यावर राम मंदिर मुद्दा आठवणं ही आत्ता नित्याचीच बाब झाली आहे. मंदिराचा प्रश्न पुढे करून मतं मिळवता येतात. राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढला जावा अशी मागणी हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना केली जाते आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट केली पाहिजे असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने जेव्हा राम मंदिर प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात होईल असे म्हटले तेव्हा सुब्रमण्यम स्वामींनी मंदिर निर्मिती संदर्भातला अध्यादेश आणला जावा असे म्हटले आहे. यानंतरच पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ही मागणी केली आहे की या संदर्भात तुमचे म्हणणे काय ते तुम्ही देशाला सांगा.

राम मंदिरावर तुमची भूमिका काय असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी चिदंबरम यांना विचारला तेव्हा ते म्हटले की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यासंदर्भात सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत वाट बघावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.