राज्यसभेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणणाऱ्या काँग्रेसला गुरुवारी भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून खिंडीत पकडले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने नुकतेच छापे टाकले होते. त्याच्या अनुषंगाने चिदंबरम यांची टू जी घोटाळ्यात काय भूमिका होती, असा सवाल विचारत भाजपने काँग्रेसवर प्रतिहल्ला चढविला.
वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी काँग्रेसशासित केरळ, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून कारवाईची मागणी केली. स्विस सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचा उल्लेख करत यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या प्रणीत कौर यांचे स्विस बँकेत खाते असल्याचे उघड झाले असल्याचे त्या म्हणाल्या. कौर या पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. भाजपने केलेल्या या तिखट हल्ल्यांमुळे काँग्रेस जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी मदत करेल अथवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.