नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठे आव्हान मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांमध्ये सरस असल्याचे दाखवून दिल्यानंतर भाजपने गुजरातमध्येही करिश्मा दाखवला आहे. गुजरातमधील ३२ जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये २३ जागांवर विजय संपादन केला आहे. भाजपने मिळवलेले हे यश काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसला केवळ आठच जागा जिंकता आल्या आहेत. दरम्यान, पोटनिवडणुकांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते.

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, नगरपालिकांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी ठरली. वापी नगरपालिकेच्या एकूण ४४ पैकी ४१ जागांवर भाजपने विजय मिळवला. काँग्रेसला फक्त तीनच जागांवर विजय मिळवता आला. सूरतमधील कनकपूर नगरपालिकेच्या २८ पैकी २७ जागांवर भाजपने विजय संपादन केला. काँग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली. गोंडल पंचायत समितीच्या २२ पैकी १८ जागा भाजपने तर काँग्रेसने केवळ ४ जागा जिंकल्या.

महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातही ‘सर’ केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. पूर्वोत्तर, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात…प्रत्येक ठिकाणी भाजपने चांगले प्रदर्शन केले आहे. मी लोकांचे आभार मानतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. देशभरात झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून लोकांना प्रगती हवी आहे. भ्रष्टाचार आणि कूप्रशासनाला लोक सहन करणार नाहीत, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यात पक्षाने मिळवलेल्या यशानंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही मतदारांचे आभार मानले. निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट दिसते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकसारख्या घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा फायदा नक्कीच झाला, असे रुपानी म्हणाले.