जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना म्हणजेच ‘आयुष्मान भारत’ ही योजना सुरू करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, यासाठी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मोहीम सुरू केली आहे. तामिळनाडूतील भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांनी मोदींना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशातील जनतेनेही या मोहीमेत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

केंद्राच्या महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत’ या राष्ट्रीय आरोग्य विमा मोहिमेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. झारखंडमधून या मोहीमेला सुरूवात झाली. प्रधानमंत्री जनआरोग्य अभियान असे पुनर्नामकरण करण्यात आलेल्या या योजनेत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण पुरवण्यात येणार आहे. देशातील १० कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. योजनेसाठी पात्र लोक सरकारी तसेच ठराविक खासगी रुग्णालयांमध्ये याचा फायदा घेऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांना शांततेसाठी दिले जाणारे नोबेल पुरस्कार द्यावे, अशी मागणी तामिळनाडूतील भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांनी केली आहे. त्यांनी नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीला यासंदर्भात पत्र लिहील्याचे समजते. या मोहीमेत नागरिकांनी सहभागी होऊन मोदींना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.