दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर ( जेएनयू) आता जाधवपूर विद्यापीठ भाजपच्या रडारवर आले आहे. हे विद्यापीठ म्हणजे देशद्रोह्यांचा अड्डा असल्याची टीका पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ( सीपीआय) आणि विद्यापीठाच्या प्राचार्यांची फूस असल्याचाही आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. जाधवपूर विद्यापीठात शुक्रवारी रात्री विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवरून अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) व डाव्या विचारसरणीच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. डाव्यांनी त्यांच्या विचासरणीविरोधात असलेल्या या चित्रपटाचे स्क्रिनिंग बेकायदेशीर पद्धतीने थांबवले होते. हे लोकशाहीच्या मुल्यांच्या विरोधात आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो, असे भाजप नेते दिलीप घोष यांनी सांगितले.
‘जेएनयूमध्ये रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या मिळतात’ 
सध्या जाधवपूर विद्यापीठ हे देशद्रोह्यांचा अड्डा बनले आहे. याठिकाणी डाव्या पक्षांचा पाठिंबा असणाऱ्या विद्यार्थी संघटना देशद्रोही घटकांसाठी पोषक वातावरण तयार करत आहेत. विद्यापीठातील एका समुहाने याठिकाणी देशविरोधी घोषणा दिल्या, असा आरोप घोष यांनी केला. याप्रकरणी विद्यापीठांच्या प्राचार्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. आम्ही केंद्राला विद्यापीठात सुरू असणाऱ्या घटनांची माहिती दिली असल्याचेही घोष यांनी सांगितले.