भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्दय़ांवरून काँग्रेस पक्षाला लक्ष्य करण्यासाठी पुढील आठवडय़ापासून भाजपच्या वतीने १५ दिवस देशव्यापी जेल भरो आंदोलन पुकारण्यात येणार आहे. घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई आणि केंद्र सरकारकडून घटनात्मक संस्थांचा केला जाणारा गैरवापर याविरुद्ध भाजप १७ ते ३० जूनदरम्यान जेल भरो आंदोलन पुकारणार असून त्यादरम्यान सत्याग्रह करून भाजप कार्यकर्ते स्वत:ला अटक करवून घेणार आहेत, असे पक्षाचे उपाध्यक्ष मुक्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.
देशात आणीबाणी लादल्याचा स्मृतिदिन पाळण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी आणि नितीन गडकरी २५ आणि २६ जून रोजी आंदोलनात सहभागी होणार आहेत. सत्तारूढ काँग्रेस घटनात्मक संस्थांचा आपल्या राजकीय विरोधकांविरुद्ध आजही ज्या पद्धतीने वापर करीत आहे आणि लोकशाही, घटना आणि संसदीय मूल्यांवर हल्ला करीत आहे, ते पाहता आणीबाणीच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत, असे नक्वी यांनी म्हटले आहे.
यूपीए सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या राजवटीत भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांची लूट करण्यात आली असली तरीही काँग्रेस भारत निर्माणच्या गोष्टी करीत आहे. त्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार निर्माण असे म्हटले पाहिजे, असेही ते म्हणाले.