युथ काँग्रेस मासिकाने व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केल्यावर आता भाजपने याच टीकेचा वापर करुन विरोधकांना उत्तर देण्याचे ठरवले आहे. मोदींचा ‘चहावाला’ असा उल्लेख करत काँग्रेसकडून त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. काँग्रेसने व्यंगचित्रातून केलेला हा हल्ला त्यांच्यावरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच गुजरातमधील भाजपचे कार्यकर्ते २६ नोव्हेंबरला चहा पित पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकणार आहेत. यानंतर २७ आणि २९ नोव्हेंबरला मोदी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. या दोन दिवसांमध्ये मोदी ८ जनसभांना संबोधित करतील.

पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याआधी भाजप कार्यकर्ते चहाच्या माध्यमातून लोकांना ‘मन की बात’शी जोडण्याचे काम करणार आहेत, असे गुजरात भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सांगितले. ‘२६ नोव्हेंबरच्या सकाळी आम्ही ‘मन की बात, चाय के साथ’चे आयोजन केले आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते राज्यातील सर्व ५० हजार मतदान केंद्रांवर मन की बात ऐकणार आहेत. चहा पिताना कार्यकर्ते मन की बात ऐकतील. लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,’ असे यादव म्हणाले.

युथ काँग्रेस मासिकाने व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यामध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे मोदींना ‘तुम्ही चहा विका,’ असे म्हणत असताना दाखवण्यात आल्या होत्या. याच व्यंगचित्राचा संदर्भ देत, काँग्रेसने नेहमीच सामान्य माणसाला कमी लेखले आहे, असे यादव यांनी म्हटले. ‘पंतप्रधानांनी केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात मानसन्मान मिळवला. मात्र काँग्रेस नेत्यांना सामान्य माणसाच्या सामर्थ्याची कल्पना नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून अशाप्रकारे मोदींची खिल्ली उडवली जाते. काँग्रेस कार्यकर्ते सध्या चिंतेत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून सोशल मीडियाचा गैरवापर सुरु आहे,’ असेही ते म्हणाले.

युथ काँग्रेसच्या ऑनलाईन मासिकाने मोदींचे व्यंगचित्र असणारे वादग्रस्त ट्विट डिलीट करत माफी मागितली होती. तर या ट्विटशी आपला संबंध नसल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. मोदींवर करण्यात आलेल्या या टीकेचा भाजपकडून पद्धतशीरपणे वापर करुन घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती आणि तसेच घडले आहे. काँग्रेसच्या टीकेचा संदर्भ घेत भाजपने ‘काँग्रेस गरिबविरोधी’ असल्याचे म्हटले आहे. खुद्द पंतप्रधान मोदीदेखील गुजरातमधील सभांमध्ये काँग्रेसने ‘चहावाला’ म्हणत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.