डॉ. स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आरोपाने राज्यसभेत गोंधळ
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी लाचप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सत्तारूढ भाजपने चालविले आहेत. दुसरीकडे या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचीच कोंडी करण्यासाठी विरोधकही सरसावले असून,या मुद्यावरून राज्यसभेत जोरदार गोंधळ झाला.
भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची मंगळवारीच शपथ घेतली. सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर लाच प्रकरण उपस्थित केले. हेलिकॉप्टर खरेदीतील मध्यस्थ ख्रिस्तीयन मायकेल यांच्या आरोपाचा संदर्भ देत डॉ. स्वामी यांनी इटलीतील उच्च न्यायालयाला पाठविण्यात आलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्या वेळी डॉ. स्वामी यांनी सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला.त्यानंतर गोंधळाला सुरुवात होताच उपसभापती पी. जे. कुरियन यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर कुरियन यांनी डॉ. स्वामी यांनी दिलेला संदर्भ कामकाजातून काढून टाकला. आपले पहिलेच भाषण असल्याने केवळ ही बाब स्पष्ट करीत आहोत, असे कुरियन म्हणाले. तर मच्छिमारांच्या हत्येवरून इटलीच्या ज्या दोन खलाशांना अटक झाली होती त्यांच्या सुटकेच्या बदल्यात ऑगस्टा प्रकरणात सोनिया गांधी यांना गोवण्याचा सौदा नरेंद्र मोदी यांनी केल्याचा आरोप या खरेदी व्यवहारातील मध्यस्थाने केला असल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने भाजपला धारेवर धरले. काँग्रेसच्या सदस्यांनी डॉ. स्वामी यांचा उल्लेख सीआयएचे हस्तक असा केल्याने गोंधळात अधिकच भर पडली आणि भोजनाच्या सुटीपूर्वीच सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करण्याची वेळ आली. या वेळी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी निदर्शने करणाऱ्या सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचे आदेश दिले.

* न्यूयॉर्कमध्ये गेल्या वर्षी मोदी आणि इटलीचे पंतप्रधान मट्टेओ रेंझी यांची भेट झाली.
* त्यावेळी दोन खलाशांच्या सुटकेच्या बदल्यात ऑगस्टा प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध पुरावे देण्याची मागणी मोदी यांनी केल्याचा आरोप मायकेल याने केला आहे.