ज्या ‘अच्छे दिना’च्या आशेने देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपला लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून दिले. ते अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्षे लागतील, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
अमित शहा यांनी भोपाळमध्ये महाजनसंपर्क अभियानाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केले. भारताला जगातील पहिल्या क्रमांकाच देश बनवायचे असेल, तर पाच वर्षांच्या काळात काहीही करता येऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उद्यास येण्यास भाजपला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका जिंकाव्या लागतील, असाही सूर त्यांनी व्यक्त केला.
शहा म्हणाले, या पाच वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार देशातील महागाई कमी करू शकते. देशाच्या सीमा सुरक्षित करू शकते. त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकासही सुनिश्चित करू शकते. देशातील गरिबी दूर करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे उपयुक्त ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.