देशभरातील ११ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सात राज्यांत भाजपाने चांगलं यश मिळवलं आहे. एकूणच भाजपा आणि युतीनं मंगळवारी या राज्यांमधील एकूण ५९ जागांपैकी ४१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि इतरांच्या पारड्यात १९ जागा गेल्या. मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात तर भाजपाने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. या दोन राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसच्या तब्बल २६ जागा आपल्या ताब्यात घेतल्या.

गुजरातमध्ये भाजपाच्या ‘डबल इंजिन’नं प्रचारानं काँग्रेसकडून ८ जागा हिसकावून घेतल्या यामध्ये सौराष्ट्रात ५ आणि ३ जागा आदिवासीबहुल भागातून जिंकल्या. यांपैकी पाच जागांवर तर राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पक्षांतर करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे आता गुजरातमधील १८२ विधानसभेच्या जागांपैकी भाजपाचं संख्याबळ १११ तर काँग्रेसचं संख्याबळ ६५ इतकं झालं आहे.

दरम्यान, मनिपूर हे तिसरं राज्य आहे जिथे भाजपानं काँग्रेसची पकड असणाऱ्या ४ जागांवर विजय मिळवला. तर इथंली काँग्रेसची पाचवी जागा अपक्ष आमदारानं पटकावली. त्यानंतर उत्तर प्रदेशात भाजपाने आपल्या सहाच्या सहा जागा राखल्या. विशेष म्हणजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी कुलदीपसिंह सेनगर याचा मतदारसंघ बंगरमाऊचाही यात समावेश आहे. तर समाजवादी पार्टीने युपीत ७ जागांवर जवळपास विजय मिळवला.

तसेच कर्नाटकमध्येही भाजपाने घौडदौड कायमी ठेवली. सिरा इथली जेडीएसची जागा भाजपाने जिंकली आणि आर. आर. नगर येथील काँग्रेसची जागा खिशात घातली. गुजरातप्रमाणेच पक्षांतर केलेल्या काँग्रेसच्या आमदाराने आर. आर. नगरमधील जागा भाजपाच्या तिकीटावर लढत त्यात विजय मिळवला. यामुळे कर्नाटकमध्ये भाजपाचं संख्याबळ ११९ तर काँग्रेस ६७ आणि जेडीएसचं ३३ असं झालं आहे.

तेलंगाणात पहिल्यांदाच भाजपाने मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची जागा घेतली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने या राज्यात ४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मध्य प्रदेशात भाजपाने १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

दरम्यान, सर्वाधिक जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला छत्तीसगडमध्ये चांगलं यश मिळालं. याठिकाणी विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ ५६ टक्के तर भाजपाचं ३०.४ टक्के आहे. यावरुन काँग्रेसने ९० जागांच्या विधानसभेत ७० जागा जिंकल्या आहेत. तसेच नागालँडमधील दोन जागांपैकी एका जागेवर एनडीपीपी आणि भाजपा युतीने विजय मिळवला तर इतर दुसरी जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली.