(महेश सरलष्कर नवी दिल्ली ): 

कर्नाटकात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने सत्तेचे कमळ उमलण्यात कोणतीही अडचण नसल्याची खात्री भाजपला होती, पण यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जनता दलाला पाठिंबा देण्याची घोषणा करताच मंगळवारी दुपारनंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला! अगदी सहज विजय हाती आला असे वाटत असतानाच भाजपला काँग्रेसने अनपेक्षित पत्ते फेकून गारद केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपने जागांची शंभरी गाठताच पं. दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील पक्षमुख्यालयात आनंदाचे उधाण आले होते. कार्यकर्त्यांचे जथेच्या जथेच्या येऊ लागले. त्यात महिला कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा होता. मिठाई वाटली जात होती. ढोल वाजवले जात होते. भाजप ११४ जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त आल्याने बहुमतासाठी असलेला ११२ चा जादूई आकडा भाजपकडे असल्याचे मनाले जात होते. केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांना जोशात प्रतिक्रियाही दिली होती. वृत्तवाहिन्यांसाठी असलेल्या स्वतंत्र  पण, हे उत्साहाचे वातावरण दुपारी तीननंतर बदलत गेले.

भाजप अध्यक्ष अमित शहा तीन वाजता पत्रकार परिषद घेतील आणि पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदीय मंडळाची बैठक घेतील असे सांगितले गेले होते. मोदींच्या भाषणासाठी कार्यकर्ते थांबून राहिले होते. मात्र, भाजपला जादूई आकडा गाठता आलेला नाही उलट पक्षाची घोडदौड १०५ जागांवर अडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जोश विरून गेला. तेवढय़ात, सोनिया गांधींनी जनता दलाला पाठिंब्याचे पत्र दिल्याचे वृत्त समजताच भाजपसाठी कर्नाटकात सत्ता स्थापन करणे सोपे नाही हे कळून चुकले! पाचनंतर तर अनेकांनी काढता पाय घेतला. अनेक नेत्यांनी भाजप अजून सत्तेच्या स्पर्धेत असल्याचे सांगत आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक सकाळी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अमित शहांची भेट घेतली होती. तेव्हा भाजपसाठी सत्ता स्थापन करण्याची औपचारिकताच उरली असल्याचे मानले जात होते. कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येड्डियुरप्पा हेही दिल्लीला येणार होते. मात्र सोनियांच्या पत्राने त्यांच्यासाठी सत्तेची गणिते उलटली. सोनियांनी पाठिंब्याचे पत्र देऊन अमित शहा यांना बेसावध पकडले. त्यातून स्वतला सावरत शहा यांनी निवासस्थानी जावडेकर, नड्डा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या दोन्ही नेत्यांना बंगळूरुला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संसदीय पक्षाची बैठक संध्याकाळी उशिरा होणार असल्याचे सांगितले गेले. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला हे मोदी समर्थक असल्याने कर्नाटकात सत्ता मिळू शकेल ही आशा कार्यकर्त्यांना वाटत होती. संध्याकाळी संसदीय पक्षाच्या बैठकीला भाजपचे नेते येत गेले तसा वातावरणात पुन्हा उत्साह पसरला आणि सत्तेच्या आशेवर शिक्कामोर्तब झाले.