सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाने सादर केलेल्या विदेशातील काळा पैसाधारक २६ भारतीय खातेदारकांची चौकशी करण्याचे आदेश  विशेष तपास पथकाला(एसआयटी) दिले आहेत.
त्यानुसार आता या २६ भारतीय खातेधारकांची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एच.एल.दत्तू यांच्या खंडपीठाने माजी न्यायाधीश एम.बी.शहा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाने विदेशातील काळा पैसाधारकांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्राने या खातेधारकांची संपूर्ण माहिती जाहीर करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘लाएकटेंस्टिंग’ बँकेतील २६ भारतीय खातेधारकांची नावे सादर केली होती.  यांपैकी १८ काळा पैसाधारकांविरोधात आय कर विभागातर्फे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या १८ जणांची नावे उघड करण्यात आली असून उर्वरित आठ जणांची नावे पाकीटबंद आहेत.
राम जेठमलानी यांनी ‘काळा पैसाधारकांची नावे उघड करण्याविषयी आदेश देण्याची विनंती करणारी’ जनहित याचिका दाखल केली होती. त्यास अनुसरून २०११ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने सदर नावे जारी करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र त्या आदेशांचे पालन न झाल्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.