पंजाबमधील गुरुदासपूर येथील बटाला येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. आग लागल्यानंतर हा स्फोट झाला. या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. अनेकजण मलब्याखाली अडकले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्फोट झाला तिथेच रहिवासी वस्ती असून काही घरांनाही स्फोटाचा फटका बसला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरु आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरु असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. हा कारखाना रहिवाशी वस्तीत आहे अशी माहिती पोलीस अधिकारी एसपीएस परमार यांनी दिली आहे. बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबरला होणाऱ्या एका लग्नासाठी कारखान्यात फटाक्यांची निर्मिती सुरु होती. याचवेळी ही दुर्घटना झाली. भीषण स्फोटानंतर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीदेखील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.