करोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असं असलं तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अनेकांनी लस घेण्याचं अद्याप टाळलं आहे. जगभरातून येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठल्या होत असल्याच्या अनेक बातम्यांनी नागरिक धास्तावले आहेत. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याचं नमूद केलं आहे.

कोविशील्ड लसीकरणानंतर एकूण ४९८ जणांचा या प्रकरणी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत रक्ताच्या गुठळ्या झाल्याची २६ प्रकरणं समोर आल्याची सांगण्यात आलं आहे. कोव्हॅक्सिन संदर्भात एकही प्रकरण समितीला आढळून आलं नाही.

कोविशील्ड लस घेतल्यानंतर प्रति दहा लाख प्रकरणात ०.६१ रिपोर्टींग रेट आहे. हेच प्रमाण इंग्लंडमध्ये दहा लाखांवर ४ आणि जर्मनीत दहा लाखांवर १० इतकं आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात २० दिवसात कोणताही त्रास झाल्यास तात्काळ लसीककरण केंद्रावर जाण्यास सांगण्यात आलं आहे. समितीच्या अहवालानुसार देशात ७ एप्रिलपर्यंत एकूण ७ कोटी ५४ लाख जणांना लस देण्यात आली आहे. त्यात कोविशील्ड ६, ८६,५०,८१९ तर कोव्हॅक्सिन ६७,८४,५६२ जणांना देण्यात आली आहे.

गोमूत्र पिते त्यामुळेच मला करोना झालेला नाही -खासदार प्रज्ञा ठाकूर

देशात गेल्या २४ तासात २ लाख ८१ हजार ३८६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३ जणांना करोना लागण झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २५ दिवसात पहिल्यांदाच तीन लाखाच्या खाली रुग्णांची नोंद झाली आहे. मागच्या एका दिवसात ४ हजार १०६ जणांचा मृत्यू झाला आहे.