आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात शनिवारी एक प्रवासी होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. या होडीमध्ये एकूण ४० प्रवासी होते. त्यातील ३३ जणांना वाचवण्यात यश आले.  यातील बहुसंख्य विद्यार्थी होते. एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी निघाली आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बचाव मोहिमेला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार होडी गौतमी नदीवर बांधण्यात आलेल्या पूलाच्या खांबाला धडकून उलटली. ही होडी तालारीवारीपालेम येथून पशूवुलंका येथे जात होती. या होडीमध्ये शाळकरी मुले होती. काही मुलांना वाचवण्यात आले आहे. काही मुले अजून बेपत्ता आहेत.

पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे कि, ज्यांना पोहता येते त्यांना सुद्धा किनारा गाठणे सोपे नाही. या भागात रस्ते नसल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी बोटीन घरी परतात. गौतमी ही गोदावरी नदीची उपनदी आहे.