ब्रह्मपुत्र नदीमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बोट बुडाली असून या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. ३० जण अजूनही बेपत्ता आहेत. या बोटीतून एकूण ५० जण प्रवास करत होते. गुवहाटीमध्ये अस्वाक्लानता मंदिर घाट जवळ बोट एका काँक्रीटच्या खांबाला धडकल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली. दोन मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे.

१० जणांना वाचवण्यात आले असून ३० जण अजूनही बेपत्ता आहेत. खराब वातावरणामुळे बचाव पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बचाव पथकांच्या मदतीसाठी लष्कराला बोलावण्यात आले आहे. राज्य आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी मदतकार्य करत आहे. आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुवहाटी शहरातील फॅन्सी बाझार येथून प्रवाशांना घेऊन ही बोट उत्तर गुवहाटीमधील मध्यम खांडा येथे चालली असताना ही दुर्घटना घडली. फक्त २२ प्रवाशांकडे वैध तिकिटे आहेत. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वजन भरलेले होते. १८ दुचाकी या बोटीवर होत्या.