नोबेल पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे लेखक बॉब डिलन यांनी म्हटले आहे. गेल्याच महिन्यात बॉब डिलन यांना साहित्यातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मात्र आपण अत्यंत व्यस्त असल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे बॉब डिलन यांनी म्हटले आहे.

बॉब डिलन यांनी याबद्दलची माहिती स्विडीश अकादमीला कळवली आहे. आधीच काही कार्यक्रम ठरलेले असल्यामुळे नोबेल पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचे बॉब यांनी स्विडीश अकादमीला सांगितले आहे. ‘स्विडीश अकादमीला बॉब डिलन यांनी पत्र लिहिले आहे. आपण डिसेंबरमध्ये अत्यंत व्यस्त असल्याने पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती बॉब डिलन यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये आहे,’ असे स्विडीश अकादमीकडून सांगण्यात आले आहे.

‘मला नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा होती. मला या सोहळ्याला उपस्थित राहण्यास आवडले असते. मात्र माझे काही कार्यक्रम आधीच ठरले असल्यामुळे असे होणे शक्य नाही. नोबेल पुरस्काराने माझा सन्मान होणार असल्याने मला अतिशय आनंद झाला आहे,’ असे डिलन यांनी त्यांच्या पत्रात म्हटले असल्याची माहिती स्विडीश अकादमीने दिली आहे.

बॉब डिलन यांचा नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय धक्कादायक नसल्याची चर्चा आहे. बॉब डिलन यांना १३ ऑक्टोबरला नोबेल पुरस्कार जाहीर झाला. मात्र यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नव्हती. त्यावेळी बॉब डिलन एका कार्यक्रमासाठी लास वेगासमध्ये होते.

बॉब डिलन यांच्या निर्णयाचा आदर करत असल्याची प्रतिक्रिया स्विडीश अकादमीकडून देण्यात आली आहे. दरवर्षी १० डिसेंबरला नोबेल पुरस्कार सोहळा संपन्न होतो. स्टॉकहोल्ममध्ये हा प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न होतो. स्विडीश संशोधक आणि उद्योगपती आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

बॉब डिलन यांच्या गाण्यांची जादू अनेक पिढ्यांवर पाहायला मिळते. नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डिलन हे पहिलेच गीतकार आहेत. याआधी कोणालाही गीत लेखनासाठी नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. बॉब डिलन यांची ब्लोविंग इन द विंड, लाईक अ रोलिंग स्टोन, मिस्टर टँबुरिन मॅन यांसारखी अनेक गाणी अजरामर झाली आहेत.