कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

गेल्या ३६ तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता होते. बंगळुरुहून साकलेशपूरला जात असताना ते नेत्रावती नदीच्या पुलावर उतरले. त्यानंतर त्यांनी कार घेऊन ड्रायव्हरला पुढे जाऊन थांब असे सांगितले. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यांचं झालं काय हा प्रश्न कायम होता. अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला आहे. सोमवार संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते.

व्ही जी. सिद्धार्थ यांचं अखेरचं पत्र काय होतं?

संचालक मंडळ आणि कॅफे कॉफी डे फॅमिली,

३७ वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर आणि परिश्रमानंतर आपण आपल्या कंपनीत ३० हजार रोजगारांची निर्मिती करु शकलो. एक चांगला ब्रांड तयार करु शकलो. मात्र यशस्वीरित्या हा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये मी अपयशी ठरलो आहे. मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले मात्र हा व्यवसाय तारु शकलो नाही नफ्याकडे नेऊ शकलो नाही. माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला जो तोटा होतो आहे, त्यातून मी कंपनीला सावरु शकत नाही, या गोष्टीचा मला प्रचंड दबाव आला आहे. सहा महिन्यांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज घेतले. माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. मी खूप काळ या सगळ्याचा सामना केला. मात्र मला आता हा तणाव सहन होत नाही. इक्विटी पार्टनर्सचाही प्रचंड दबाव माझ्यावर आहे.

मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करतो आहे हा व्यवसाय आता नव्या संचालक मंडळाकडे देण्याची वेळ आली आहे. मला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती. मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे. मला खात्री आहे तुम्ही मला याबाबत माफ कराल. तुम्ही मला समजून घ्याल अशी खात्री आहे. कृपा करुन मला माफ करा.

व्ही. जी. सिद्धार्थ

२४ तासांपेक्षा जास्त काळ सिद्धार्थ यांना शोधण्यासाठी मोहीम चालवण्यात आली.अखेर त्यांचा मृतदेह सापडला आहे.