जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येतही कमालीची वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत काही परिचित आणि मोठ्या व्यक्तींनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन झाली होती. तसंच ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनाही करोनाची लागण झाल्यीची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून खुद्द त्यांनीच शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

“मी करोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,” असं जिनिन म्हणाल्या. तसंच सध्या त्या होम आयसोलेशमध्ये राहणार आहेत. यासोबतच त्या आपलं कामही सुरू ठेवणार असल्याचं म्हणाल्या.

त्यांच्यापूर्वी ब्रिझिलचे राष्ट्राध्यक्ष जे. बोलसेनारो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि मोनाकोचे प्रिन्स अलबर्ट द्वितीय यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. बोरिस जॉन्सन यांना मार्च महिन्यात काही दिवसांसाठी उपचासाच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, बोलिवियामध्ये आतापर्यंत ४३ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ५०० जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.