पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाकडे वाटचाल करत असणाऱ्या माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्याविषयी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भारत- पाकिस्तान संबंध सुधारण्याचा मानस मनाशी बाळगणाऱ्या इम्रान यांना सदिच्छा दिल्या आहेत.

गुरुवारी पाकिस्तानमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खान यांनी भारत- पाकिस्तान संबंधाविषयी वक्तव्य करत भारतासोबत संबंध सुधारण्याचा माझा प्रयत्न असेलच तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावलं पुढे टाकू, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यालाच अधोरेखित करत ऋषी कपूर यांनी आपल्या ‘मुल्क’ या आगामी चित्रपटाचा दाखला देत एक ट्विट केलं.

‘अगदी बरोबर म्हणालात तुम्ही इम्रान खान. किंबहुना गेल्या दोन दिवसांपासून भारत- पाकिस्तान संबंधांविषयी जे मी माध्यमांसमोर बोलत होतो तेच तुम्हीही बोलला आहात. मी आशा करतो की तुमच्या मुल्कचं माझ्या मुल्कसोबतचं नातं सुधारण्यात तुम्हाला यश मिळेल’, असं ट्विट त्यांनी केलं.

‘गुलछबू’ इम्रान खानला नवा पाकिस्तान घडवता येईल का? – शिवसेना

गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले आहेत. ‘मुल्क’ असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटातून अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ऋषी कपूर एका मुस्लिम व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तेव्हा आता त्यांच्या या ट्विटवर शेजारी राष्ट्रातून काही उत्तर येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.