एअर इंडियाच्या मुंबई-नेर्वाक विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टीड विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे ४.५० ला विमानाने नेवार्कसाठी उड्डाण केले होते. या विमानाच्या उड्डाणाला तीन तास विलंब झाला होता. बोईंग ७७७ विमान ब्रिटनच्या हवाई हद्दीत असताना वैमानिकाला विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यामुळे विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टीड विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

ब्रिटनच्या हवाई हद्दीत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ब्रिटीश एअर फोर्सच्या अत्याधुनिक टायफून विमानांनी सुपरसॉनिक वेगाने हवेत झेप घेतली. मुंबई-नेर्वाक विमानाचे स्टॅनस्टीड विमानतळावर लँडिंग होईपर्यंत ब्रिटीश फायटर जेटसनी संरक्षण दिले.

रॉयल एअर फोर्सच्या तळाजवळ स्टॅनस्टीड विमानतळ असून हवाई सुरक्षेशी संबंधित अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. एअर इंडियाची हिथ्रो विमानतळावरील टीम स्टॅनस्टीडच्या दिशेने रवाना झाली आहे.