परदेशातून भारताविरोधात रचले जाणारे कट, शत्रुच्या कारवाया यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ ने १९८० च्या दशकात तत्कालिन सोव्हिएत युनियनमध्ये दोन एजंट्सची नियुक्ती केली होती. भारताच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळणे अपेक्षित होते. तत्कालिन मिखाईल गोर्बचेव्ह यांच्यासरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले एडवर्ड अ‍ॅम्ब्रोसिएविच शेवार्डनाझे आणि रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंधित ते दोन एजंटस होते.

पत्रकार यतीश यादव यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकातून हा दावा केला आहे. ‘रॉ’ ने केलेल्या गुप्त कारवायांवर हे पुस्तक आधारीत आहे. या पुस्तकात अशोक खुराना या कोडनेमने एका अधिकाऱ्याबद्दल लिहिले आहे. नावानिशी कोणाचीही पुस्तकात ओळख पटवण्यात आलेली नाही. सर्वांना कोडनेम दिले आहे. यतीश यादव यांनी ते दोन एजंट कोण आहेत, त्याचे पुरेसे संकेत दिले आहेत. दोन एजंटपैकी एक एडवर्ड अ‍ॅम्ब्रोसिएविच शेवार्डनाझे यांचा लहान भाऊ आहे तर दुसरी एजंट व्लादिमीर पुतिन यांची गर्लफ्रेंड आहे.

१९८८ साली सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बचेव्ह भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या सगळयाची सुरुवात झाल्याचे पुस्तकात म्हटले आहे. अशोक खुराना यांनी रशियाच्या टॉपच्या राजकारणाचा छोटा भाऊ अ‍ॅलेक्सांड्रेची भेट घेतली. तो गोर्बचेव्ह यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आला होता. एडवर्ड अ‍ॅम्ब्रोसिएविच शेवार्डनाझेही भारत दौऱ्यावर आले होते.

काही महिन्यांनी अ‍ॅलेक्सांड्रेने अशोक खुराना यांना अनास्तासिया कोरकीयाबद्दल माहिती दिली. अनास्तासियाचे अ‍ॅलेक्सीबरोबर त्यावेळी प्रेमसंबंध होते. अ‍ॅलेक्सीचे FSB मध्ये मोठे वजन होते. यतीश यादव यांच्यापुस्तकानुसार अशोक खुराना अ‍ॅलेक्सांड्रे आणि अनास्तासिया दोघांच्या संपर्कात होते. १९८९ मध्ये दोघे ‘रॉ’ साठी काम करायला तयार झाले. या दोन एजंटमुळे ‘रॉ’ ला जर्मनीच्या एकत्रीकरणाबद्दल अमेरिका-रशियाची योजना, अण्वस्त्र चाचणीबद्दलचे त्यांचे धोरण आणि चीन-पाकिस्तानबद्दलची भूमिका समजू शकली.

अनास्तासियाचा प्रियकर अ‍ॅलेक्सीने १९९९ मध्ये रशियाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. १९९८-९९ मध्ये पुतिन FSB चे प्रमुख होते. त्यानंतर १९९९ साली ते रशियाचे पंतप्रधान झाले. २००० साली ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. अ‍ॅलेक्सी म्हणजेच पुतिन असल्याचे संकेत या पुस्तकातून देण्यात आला आहे. यतीश यादव यांनी त्यांच्या पुस्तकातून ही सर्व माहिती दिली आहे.