इंग्रजी ग्रंथविश्वात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मॅन बुकर’ पुरस्काराची लघुयादी जाहीर झाली असून त्यात यंदा तीन ब्रिटिश, दोन अमेरिकी आणि एक कॅनडातील कादंबरीकारांच्या पुस्तकांचा समावेश आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या या यादीत दोन ब्रिटिश साहित्यिकांनी लिहिलेल्या पहिल्याच कादंबऱ्यांचा समावेश आहे. ब्रिटिश कवी रॉबिन रॉबर्टसन यांची गद्य-पद्य यांचे मिश्रण असलेली ‘द लाँग टेक’ आणि डेझी जॉन्सन यांची ‘एव्हरीथिंग अंडर’ यादीत समाविष्ट झाली आहे. २७ वर्षांच्या डेझी जॉन्सन बुकर पुरस्काराच्या यादीत समाविष्ट होणाऱ्या सर्वात तरुण लेखिका आहेत. अमेरिकी लेखक निक डनासो यांचे बहुचर्चित ग्राफिक नॉव्हेल सॅबरीना आणि कॅनडामधील लेखक मायकेल ओदान्शी यांची वॉरलाइट कादंबरी लघुयादीत स्थान पटकावू शकली नाही.

अमेरिकी लेखिका रेचल कुशनेर यांची ‘द मार्स रूम’ आणि रिचर्ड पॉवर्स यांची पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी ‘द ओव्हरस्टोरी’ या कादंबऱ्यांनी यादीत स्थान मिळवले आहे.  कॅनडियन लेखिका इसाय एडुग्यान यांनी पळून गेलेल्या एका गुलामाची शब्दबद्ध केलेली कहाणी ‘वॉशिंग्टन ब्लॅक’, तसेच उत्तर आर्यलडच्या लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांची ‘मिल्कमन’ या कादंबऱ्यांचाही यादीत समावेश झाला आहे. ५० हजार पौंडांच्या (६६ हजार अमेरिकी डॉलर्स) या पुरस्काराच्या विजेत्याचे नाव १६ ऑक्टोबरला लंडनमध्ये जाहीर केले जाणार आहे.