ग्लासगो शहरातील १९८०च्या दशकातील निम्नमध्यमवर्गीय जगणे केंद्रभागी करणाऱ्या स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’  कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला. त्यांची ही पदार्पणातील कादंबरी आहे.

स्टुअर्ट यांनी स्कॉटलंडमधील बालपण आत्मकथेऐवजी कादंबरीच्या रुपात समोर आणले. उपजीविकेसाठी वस्रोद्योगात असलेल्या या लेखकाने   ग्लासगो शहर आणि त्या भवतीच्या उपनगरांचे पर्यटन ‘शगी बेन’मधून घडविले. तिथल्या माणसांइतक्याच कुरूप बनलेल्या शहरांचे हे तिथल्या साहित्य किंवा पत्रकारितेतूनही अधोरेखित न झालेले सूक्ष्म अवलोकन आहे. दुबईस्थित  भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांचे नाव अंतिम सहा लेखकात होते, पण त्यांच्या ‘बन्र्ट शुगर’या कादंबरीला बुकरचा मान मिळाला नाही. झिम्बाब्वेचे लेखक त्सित्सी दांगारेम्ब्वा यांची ‘धिस मोर्नेबल बॉडी’, डायन कुक यांची ‘दी विल्डरनेस’, माझा मेंगिस्टे यांची ‘दी श्ॉडो किंग’, ब्रँडन टेलर यांची ‘रिअल लाइफ’  या कादंबऱ्या शर्यतीत होत्या. स्टुअर्ट यांनी कादंबरी आपल्या आईला अर्पण केली आहे.

लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट या संस्थेतून स्टुअर्ट पदवीधर झाले. नंतर ते फॅशन डिझायनिंगमध्ये कारकीर्द करण्यासाठी न्यूयॉर्कला आले. कालव्हीन क्लेन, राल्फ लॉरेन, गॅप या उत्पादनांसाठी त्यांनी काम केले असून फावल्यावेळात त्यांनी एक दशकापूर्वी लेखन सुरू केले होते.

केलमन यांचे स्मरण

स्टुअर्ट हे बुकर पुरस्कार मिळालेले दुसरे स्कॉटिश लेखक आहेत. यापूर्वी १९९४ मध्ये जेम्स केलमन यांना हा पुरस्कार ‘हाउ लेट इट वॉज, हाउ लेट’ या पुस्तकासाठी मिळाला होता. ‘त्या कादंबरीमुळे  पहिल्यांदा माझे आयुष्य बदलले होते, कारण त्यात मला पहिल्यांदा माझे लोक, माझी बोली भेटली होती.’,असे स्टुअर्ट यांनी केलमन यांच्या पुस्तकाबाबत म्हटले आहे.

तीस संपादकांच्या नकारानंतर..

डग्लस स्टुअर्ट यांची बुकर पुरस्कारप्राप्त ‘शगी बेन’ ही कादंबरी तीस संपादकांनी नाकारली होती. एका बडय़ा प्रकाशनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. कादंबरी प्रकाशित होताच तिचा बोलबाला झाला आणि आता ती बुकरची मानकरी ठरली.

ही कादंबरी लिहिताना मला माझ्याच जखमांवर फुंकर घालता आली, यातून माझे भावना विरेचन झाले. मला लेखकच व्हायचे होते. आता हा पुरस्कार मिळाल्याने हे स्वप्न साकारले आहे. यातून माझे जीवन बदलून गेले आहे.

-डग्लस स्टुअट

अत्यंत प्रवाही, सामाजिक अंतरंगांची डूब असलेल्या या कादंबरीत  ग्लासगोतील सामाजिक जीवनाचे रेखीव व अचूक चित्रण आहे. बेन यांच्यावर आलेले कठीण प्रसंग व त्यातून उलगडत गेलेली ही कथा हृदय पिळवटून टाकणारी आहे.

-मार्गारेट बस्बी, निवड मंडळाच्या अध्यक्षा