महापरिनिर्वाण दिनाच्या एक दिवस आधी काही अज्ञात समाजकंटकांनी आंध्र प्रदेशातील एका गावात हौदोस घातला. या समाजकंटकांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आंबेडकरांच्या प्रतिमेचे नाक आणि कान याचे नुकसान करण्यात आले आहे. या घटनेमुळे दलित समाजात रोष व्यक्त केला जात आहे. उद्या ६ डिसेंबर रोजी आंबेडकरांचा ६३वा महापरिनिर्वाण दिन आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


आंध्र प्रदेशातील पोडागंतयाडा भागात ही घटना घडली आहे. हा भाग विशाखापट्टणम येथून जवळच आहे. विशाखापट्टणममध्ये महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यांत याच जिल्ह्यातल्या मधुरवाडा भागात समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीदिनाच्या एक दिवस आधी त्यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करीत गुन्हा देखील दाखल केला होता.

गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची तोडफोड करण्याचे सत्र सुरु झाले होते. यामध्ये त्रिपुरात भाजपा सत्तेत आल्यानंतर महान साम्यवादी नेते लेनिनचा पुतळा पाडण्यात आला होता. यावरुन खूपच राजकीय वातावरण तापले झाले होते. तसेच उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने या पुतळ्याची डागडुजी करुन त्याला संपूर्ण भगव्या रंगात रंगवले होते. त्यावरुनही राजकारण बरेच पेटले होते.