‘ब्रिटनचे राजघराणे मुळीच वंशवादी नाही’, असे सांगून आपला भाऊ राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेघन यांनी केलेले वंशवादाचे आरोप राजपुत्र विल्यम यांनी गुरुवारी नाकारले.

राजपुत्र हॅरी व डचेस ऑफ ससेक्स मेघन यांनी ओप्रा विन्फ्रे हिला दिलेली स्फोटक मुलाखत रविवारी अमेरिकेत प्रक्षेपित करण्यात आली होती. पूर्व लंडनमधील एका शाळेला दिलेल्या भेटीत विल्यम यांच्या रूपात राजघराण्यातील पहिल्याच व्यक्तीने या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली.

हॅरी व मेघन यांनी केलेल्या वंशवाद आणि गैरवर्तन याबाबतच्या आरोपांना बंकिंगहॅम पॅलेसने ६१ शब्दांच्या एका निवेदनाद्वारे उत्तर दिले, मात्र या मुलाखतीवरून निर्माण झालेला वाद शमवण्यात ते यशस्वी झालेले नाहीत.

‘या मुलाखतीनंतर मी हॅरीशी बोललेलो नाही, मात्र मी बोलेन’, असे सिंहासनाचे दुसऱ्या क्रमांकाचे दावेदार असलेले विल्यम यांनी सांगितले. हॅरी व मेघन यांच्या मुलाखतीमुळे राजघराण्याला हादरा पोहचला आहे.  या तणावाबाबत राजघराणे काय प्रतिक्रिया देते याकडे लोकांचे लक्ष लागले होते.