जगभरात सर्वत्र करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून आपली टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये होते. परंतु आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अनेक दिवसांनंतरही त्यांच्यात करोनाची लक्षणं दिसत असल्यानं त्यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वीय क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं होतं. आपण घरात राहिलो तर करोनाच्या प्रादुर्भावापासून लवकर आपली सुटका होऊ शकते, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी टिव्हीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता.

तर दुसरीकडे प्रिन्स चार्ल्स यांनादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या स्कॉटलंड येथील घरात होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तर युरोपात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांना बकिंगहम पॅलेसमधून विंडसर कॅसल येथे हलवण्यात आले होते.

४ हजार ९०० जणांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४७ हजार ८०६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ४ हजार९४३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अमेरिकेतही करोनानं थैमान घातलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेतही १ हजार २०० जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत करोनामुळे अमेरिकेतील २ हजार ४७२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.