१९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसलेल्या दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईत ब्रिटनचीभूमिका अत्यंत मर्यादित आणि केवळ सल्ल्यापुरतीच होती, असे स्पष्टीकरण ब्रिटनने मंगळवारी दिले.
सुवर्ण मंदिरातील दहशतवाद्यांविरोधात केलेल्या लष्करी कारवाईत ब्रिटनची भूमिका आणि तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. याप्रकरणी ब्रिटनकडून योग्य तऱ्हेने तपास होत नसल्याबाबत येथील शीख समुदायाने नाराजीही व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर ब्रिटनचे परराष्ट्र  सचिव विल्यम हेग यांनी मंगळवारी संसदेत या प्रकरणात ब्रिटनच्या सहभागाबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात घुसलेल्या दहशवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन ब्लूस्टार राबवण्यात आले. मात्र या कारवाईची योजना आखण्याच्या टप्प्यावर भारत सरकारला सल्ला देण्यापलिकडे ब्रिटनची कोणतीही भूमिका नव्हती.  सुवर्ण मंदिरातील धडक लष्करी कारवाईबाबतचे गुप्त दस्तावेज सुमारे ३० वर्षांनंतर उघड झाल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.