हापूस आंब्यावर युरोपियन संघाने घातलेल्या बंदीचे भारतात तीव्र पडसाद उमटल्यानंतर ब्रिटनने या प्रकरणी पुढाकार घेतला आहे. भारताची नाराजी वाढू नये यासाठी ब्रिटन सरकारने भारत आणि ब्रिटनमधील हापूस आणि भाजीपाला आयात-निर्यातदारांची गुरुवारी बैठक घेतली आणि युरोपियन संघाने हापूसवर डिसेंबर २०१५ पर्यंत घातलेली बंदी उठवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याबाबत चर्चा केली.
ब्रिटनचे पर्यावरणमंत्री लॉर्ड डे मौले यांनी या विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला दोन्ही देशांचे व्यापारी प्रतिनिधी, ब्रिटनमधील भारताचे उप उच्चायुक्त वीरेंद्र पॉल आणि कृषीक्षेत्राशी संबंधित संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतासोबतच्या व्यापाराबाबत ब्रिटनचे सरकार अधिक सकारात्मक आहे. त्यामुळेच भारतीय नियंत्रक, आयातदार,निर्यातदार यांना ब्रिटनच्या नियंत्रकांच्या सहकार्याने तांत्रिक मदत करण्याबाबत ब्रिटन सरकार अनुकूल आहे, असे लॉर्ड मौले यांनी सांगितले.
युरोपियन संघाने हापूसवर घातलेली बंदी डिसेंबर २०१५ पूर्वी उठवली जावी यासाठी सर्व व्यापारी प्रतिनिधींनी योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीदरम्यान पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण कामकाज विभाग (डेफ्रा) या संघटनेने बंदी उठवण्याबाबत युरोपियन आयोग आणि भारतीय नियंत्रक यांच्यात चर्चा घडवून आणण्याबाबत पुढाकार घेईल. तसेच भारतीय निर्यातदार आणि संबंधितांना योग्य ते प्रशिक्षण पुरवण्याचेही मान्य केले.
फिक्की या संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ बिर्ला यांनी म्हटले की, युरोपियन संघाने भारतातून येणाऱ्या निवडक भाज्या आणि फळांवर घातलेली बंदी दुर्दैवी आहे. मात्र आता ब्रिटन सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्यासाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय वंशाचे खासदार किथ वाझ यांनी हापूसवरील बंदीबाबतचा मुद्दा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्यासमोर या महिन्याच्या सुरुवातीला सभागृहात मांडला होता. त्यावर भारताचे नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याविषयी चर्चा करण्याचे आश्वासनही कॅमरून यांनी दिले होते.

पाकिस्तान मोठय़ा प्रमाणात आंबा निर्यात करणार
भारतीय हापूसवर युरोपियन संघाने बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय ताजा असतानाच आता पाकिस्तानने यावेळी  ६५ दशलक्ष डॉलर किंमतीचा आंबा परदेशात निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानातून ६० दशलक्ष डॉलरचे आंबे निर्यात झाले होते. मात्र या वर्षी १७५,००० टन आंब्यांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट अखिल पाकिस्तान फळे आणि भाजीपाला निर्यातदार, आयातदार आणि व्यापाऱ्यांच्या संघटनेने डोळ्यासमोर ठेवल्याचे संघटनेचे प्रवक्ते वाहीद अहमद यांनी सांगितले.
युरोपियन संघाने संख्येपेक्षा गुणवत्तेचा मुद्दा पुढे करीत भारताच्या हापूस आंब्यावर बंदी घातली आहे. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या आंब्याच्या निर्यातीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वर्षी युरोपियन संघाच्या बाजारपेठेत पाकिस्तानातून २४ हजार टन आंबा जातो. या वर्षी २४ मे पासून पाकिस्तानी आंब्यांची निर्यात सुरू होणार आहे. जपान आणि अमेरिकेऐवजी दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये अधिक आंबा पाठविण्यात येणार असल्याचेही अहमद यांनी सांगितले.