21 March 2019

News Flash

भारत सरकारने थकवलं ब्रिटीश कंपनीचं २५० कोटींचं बिल, २०१० कॉमनवेल्थचं केलं होतं कव्हरेज

२०१० दिल्ली कॉमनवेल्थचं बिल थकवण्यात आल्याने ब्रिटीश कंपनीने भारत सरकारला अत्यंत तिखट शब्दांत पत्र लिहिलं असून नाराजी व्यक्त केली आहे

सध्या देशभराचं लक्ष गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समधील भारताच्या कामगिरीकडे आहे. कॉमनवेल्थमध्ये भारतीय खेळाडू यशस्वी कामगिरी करत असताना, भारत सरकारसाठी मात्र वाईट बातमी आहे. २०१० दिल्ली कॉमनवेल्थचं बिल थकवण्यात आल्याने ब्रिटीश कंपनीने भारत सरकारला अत्यंत तिखट शब्दांत पत्र लिहिलं असून नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील सॅटेलाइट आणि ब्रॉडकास्ट कंपनी स्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेसने (SIS) केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांना हे दोन पानांचं पत्र लिहिलं आहे. SIS कंपनीकडे २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचं ग्लोबल कव्हरेज करण्याची जबाबदारी होती. आमचं २५० कोटींचं बिल तात्काळ चुकतं करावं अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

स्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड अॅमेस यांनी हे पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी भारतीय सरकारने आम्हाला ज्याप्रकारे वागणूक दिली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारण विभागात भारताची प्रतिमा डागाळली असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय खेळ आणि प्रसारण भागात भारताच्या प्रतिमेला तडा गेला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

२०१० मध्ये ३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स पार पडले होते. यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. ‘आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रसारमाध्यमांचं कॉमनवेल्थ गेम्सकडे लक्ष असताना मी एक कठीण आणि लाजिरवाणी गोष्ट तुमच्या (राज्यवर्धन राठोड) निदर्शनास आणू इच्छितो ती म्हणजे भारताने अजून आमचं २५० कोटींचं बिल चुकतं केलेलं नाही. व्याज पकडलं तर ही रक्कम २८० कोटींपर्यंत गेली आहे’, असं अॅमेन यांनी पत्रात लिहिलं आहे.

गेल्या आठ वर्षांपासून भारत बिलाचे पैसे देण्यास नकार देत असल्या कारणाने तक्रार केली तरीही अद्याप पेमेंट झालं नसल्याचं अॅमेन बोलले आहेत.

बी एस लाली २००९ मध्ये प्रसार भारतीचे सीईओ असताना कॉमनवेल्थ गेम्सचं प्रसारण करण्यासाठी स्पोर्ट इन्फर्मेशन सर्व्हिसेससोबत हा करार करण्यात आला होता. मात्र व्ही के शुंघलू समितीच्या अहवालात प्रसारण विभागात घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. यामुळेच हे बिल थकलं असल्याचं कळत आहे.

First Published on April 13, 2018 4:36 am

Web Title: british company writes letter to indian government demanding to pay 250 crore bill