ब्रिटनचे नवे संरक्षण मंत्री गेविन विलियम्सन यांनी इस्लामिक स्टेटसाठी (आयसीस) लढणाऱ्या ब्रिटीश नागरिकांना शोधून काढले पाहिजे आणि त्यांचा खात्मा केला पाहिले असे वक्तव्य केले आहे. जे आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये गेले आहेत त्यांच्यावर देशात येण्यास बंदी घालण्याची गरज असल्याचेही विलियम्सन म्हणाले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी दहशतवादी मारले गेल्याने ब्रिटनला कोणताही त्रास होणार नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त करत दहशतवादाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.

ब्रिटनवरील वाढता दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल ते सर्व आपण करायला हवे असे मत विलियम्सन यांनी या मुलाखतीमध्ये बोलताना व्यक्त केले. एका आकडेवारीनुसार ८०० ब्रिटीश पासपोर्टधारक तरुण-तरुणी इराक आणि सीरियामध्ये आयसीसच्या बाजूने लढण्यासाठी गेले आहेत. ज्यापैकी १३० जणांचा मृत्यू झाला आहे तर ४०० जण पुन्हा ब्रिटनमध्ये आले आहेत. आजही ब्रिटीश पासपोर्ट असणारे २७० जण पश्चिम आशियाई देशांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रिटनमधील तरुणांचा या दहशतवादी संघटनेकडे असणारा ओढा २०१४ साली जिहादी जॉनच्या चेहऱ्याच्या रुपाने समोर आला. ब्रिटीश नागरिक असणारा मोहम्मद इमवाजी आयसीसच्या व्हिडीओमध्ये लोकांचे गळे कापताना दाखवण्यात आल्याने जगभरात खळबळ माजली होती. पहिल्यांदाच अशाप्रकारे उघडपणे पाश्चिमात्य देशातील तरुणाईचा हा दहशतवादाला असणारा पाठिंबा दर्शवणारा व्हिडीओ जगासमोर आला होता.

कारभारातील घोटाळ्यांमुळे मागील महिन्यात मायकल फॅलन यांनी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रीपदाचा राजीनाम दिल्यानंतर विलियम्सन यांना संरक्षण मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी दुसऱ्या देशात पळून जाणाऱ्या तरुणांचा सरकारी यंत्रणेकडून शोध घेतला जाणार असल्याची माहिती दिली. आयसीसमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या ब्रिटीश पासपोर्टधारी तरुणांना देशात येण्यापासून बंदी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील अनेक भागांमध्ये पसरून दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या आयसीस समर्थकांचा शोध सुरु राहिलं असेही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.