कर्नाटकातील सत्तासंघर्ष अजूनही संपुष्टात आलेला नाही. भलेही काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकारचा बुधवारी शपथविधी होणार असला तरी भाजपाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या मते हे सरकार तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या सरकारच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त केली. दरम्यान, आज (दि.२३) जेडीएसचे एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने देशातील विरोधी पक्ष आपली एकता दाखवणार असल्याचे बोलले जाते.

काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कर्नाटकमध्ये अँटी पीपल मँडेट डे म्हणजे जनादेश विरोधी दिवस साजरा केला जात आहे. याचदरम्यान येडियुरप्पा म्हणाले की, भूक, लालसा आणि सत्ता हेच काँग्रेस-जेडीएस आघाडीचा आधार आहे. अशापद्धतीने सत्तेवर आलेले सरकार तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवसही टिकणार नाही, असे त्यांनी म्हटले.

कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा जिंकत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. येडियुरप्पा यांनी १७ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. पण दि. १९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विश्वासमत चाचणीपूर्वीच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला सरकार बनवण्याची संधी मिळाली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक १०४ जागा पटकावल्या. तर काँग्रेस ७८ आणि जेडीएस ३८ जागांसह तिसऱ्या स्थानी होते. दरम्यान, काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आणि ३८ जागा जिंकूनही जेडीएसचे नेते कुमारस्वामी हे राज्याचे नेतृत्व करणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून जी. परमेश्वर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.