मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडून कुरापती सुरू असून, सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दलाकडून घुसखोरीसाठी वापर करण्यात येणाऱ्या जमिनीतील भूयारी मार्गांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. शोध घेत असताना जवानांना सीमेवर जमिनीत २५ फूट खोलीवर १५० मीटर लांबीचा बोगदा आढळून आला आहे. त्यामुळे घुसखोरीचा मोठा कट लष्करानं उधळून लावला आहे.

सीमा सुरक्षा दलानं आंतरराष्ट्रीय सीमेलगत भूयारी मार्गांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सुरू असताना बीएसएफला शनिवारी जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात मोठा बोगदा आढळून आला. हा बोगदा जमिनीत २५ फूट खोलीवर असून, त्याची लांबी १५० मीटर असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही सापडल्या आहेत. या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर असल्याचंही लष्करानं म्हटलं आहे. पाकिस्तानातून येणारे दहशतवादी अशा भूयारी मार्गांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करतात. या बोगदा सापडल्यानं लष्कराला घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

यापूर्वीही लष्कराला जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर अशा प्रकारचे भूयारी मार्ग आढळून आले होते. २०१२मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना ४०० मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. हा बोगदाही सांबा सेक्टरमध्ये होता. तर दुसरा एक बोगदा पलनवाला सेक्टरमध्ये २०१४ मध्ये आढळला होता. याच वर्षी सांबा जिल्ह्यातील छिल्लारी परिसरातही एक भूयारी मार्ग सापडला होता. हा भूयारी मार्ग भारतीय हद्दीत २५ मीटर आतापर्यंत करण्यात आलेला होता. त्याचबरोबर २०१६ मध्ये पाकिस्तानातून येणारा आरएस पूरा सेक्टरमध्येही सापडला होता.