भारत-बांगलादेश सीमेवर सोमवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या कारवाईत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा मोठा साठा पकडण्यात आला. याप्रकरणी शरीफ उल शाह (३२) या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून तो पाकिस्तानमधून आल्याचा संशय आहे. बीएसएफच्या जवानांनी शरीफ शाह यांच्याकडून दोन हजाराच्या एकुण ९६ हजार रुपये मुल्याच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी ८ फेब्रुवारीला बांगलादेशच्या सीमेवरील मुर्शिदाबाद अझिझूर रेहमान याला ताब्यात घेण्यात आले होते. अझिझूर रेहमान हा मुळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्याकडे दोन हजार रूपयांच्या ४० बनावट नोटा सापडल्या होत्या. चौकशीदरम्यान त्याने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची कबुली दिली होती. याशिवाय, आपण बांगलादेशच्या सीमेवरून तस्करी करून या नोटा भारतामध्ये आणल्याचेही सांगितले होते.

दोन हजाराच्या नोटांनी सजवलेल्या गाडीमागचे व्हायरल सत्य उघड

अझिझूर रेहमान याच्या चौकशीत बनावट नोटांबद्दलची आणखी काही माहिती पुढे आली आहे. दोन हजार रूपयांच्या बनावट नोटांची छपाई आणि दर्जानुसार तस्करांकडून ४०० ते ६०० रूपयांच्या दरम्यान या नोटांची खरेदी केली जाते.  केंद्र सरकार नव्या नोटांची नक्कल करणे अशक्य असल्याचा दावा करत असले तरी छाप्यांमध्ये हाती लागलेल्या दोन हजारांच्या बनावट नोटांवर नजर टाकल्यास नव्या नोटांमधील १७ पैकी ११ सुरक्षा वैशिष्ट्यांची तंतोतंत नक्कल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये नोटेवरील पारदर्शक भाग, वॉटरमार्क, अशोक चिन्ह, नोटेच्या डाव्या बाजूस छापण्यात आलेला ‘Rs 2000’ हा मजकूर, गव्हर्नरांच्या स्वाक्षरीसह असणारे हमीपत्र आणि नोटीचे मूल्य दर्शविणारी देवनागरीतील अंक यांचा समावेश आहे. याशिवाय, नोटेच्या मागच्या बाजूस असणारे चांद्रयानाचे चिन्ह आणि स्वच्छ भारतचे बोधचिन्ह या वैशिष्ट्यांचाही बनावट नोटेवर तंतोतंत नक्कल करण्यात आली आहे. बनावट नोटांच्या कागदाचा आणि छपाईचा दर्जा चांगला नसला तरी या नोटा खऱ्या नोटांशी सार्धम्य साधणाऱ्या आहेत.

मोदी सरकारकडून दहशतवाद आणि नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला असला तरी आता ही समस्या पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला होता. काळ्या आणि बनावट पैशाला चाप लावणे हे नोटाबंदीच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक होते. त्यामुळे दहशतवाद्यांना पुरवली जाणारी आर्थिक रसद तुटेल, असा केंद्र सरकारचा कयास होता. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने उलटत नाही तोच पाकिस्तानमधून भारतात पुन्हा बनावट नोटा दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, यावेळी बनावट नोटा भारतामध्ये पोहचवण्यासाठी पाकिस्तानकडून बांगलादेशच्या भूमीचा वापर केला जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली होती.