सर्व अंदाजांना धक्का देत बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते भीमराव आंबेडकर यांना उमेदवारी दिली. मायावती आपले बंधू आनंद सिंह यांना उमेदवारी देतील असा कयास लावण्यात आला होता. परंतु, त्यांनी पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि माजी आमदार भीमराव आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.

मायावती यांनी मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये आंबेडकरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भीमराव आंबेडकर हे इटावा येथील रहिवासी असून ते २००७ मध्ये लखना विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वर्ष २०१२ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती.

राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाने (सप) बसपला पाठिंबा द्यावा तर पोटनिवडणुकीसाठी बसपने सपला पाठिंबा देण्याचे ठरले आहे. उत्तर प्रदेशात ‘दलित व्होट बँक’वर पुन्हा एकदा पकड मिळवण्यासाठी मायावतींनी पक्षाचे निष्ठावंत आणि दलित चेहरा असलेल्या भीमराव आंबेडकरांना तिकीट दिले आहे. उत्तर प्रदेशमधील १० राज्यसभेच्या जागांसाठी २३ मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बसपचे १९ आमदार आहेत. अशांत पाठिंबा घेतल्याशिवाय निवडणूक जिंकणे मायावतींसाठी कठीण होते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी परस्परांत ही आघाडी केल्याचे समजते.