बहुजन समाज पक्षाचे (बसप) नेते राजेश यादव यांची अलाहाबाद विद्यापीठाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. यादव आपले मित्र डॉ. मुकूल सिंह यांच्याबरोबर फॉर्च्युनर कारमधून विद्यापीठा बाहेरील ताराचंद हॉस्टेल येथे आले होते. यादव यांच्या हत्येचे वृत्त पसरताच संतप्त कार्यकर्त्यांनी जाळपोळ करण्यास सुरूवात केली असून पोलिसांविरोधात घोषणाही दिल्या जात आहेत.

मुळचे भदोही येथील दुगुना गावचे रहिवासी असलेल्या यादव यांनी २०१७ मध्ये ज्ञानपूर विधानसभा मतदारसंघातून बसपकडून निवडणूक लढवली होती. ते ज्ञानपूर विधानसभा मतदारसंघाचे बसपचे प्रभारी देखील होते. यादव यांच्या हत्येचे वृत्त कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ करण्यास सुरूवात केली.

यादव सध्या कंपनीबाग मागील हरितकुंज अर्पाटमेंटमध्ये राहत होते. सोमवारी रात्री ते राज नर्सिंग होमचे डॉ. मुकूल यांच्याबरोबर ताराचंद हॉस्टेल येथे एका व्यक्तीस भेटण्यास आले होते. रात्री सुमारे २.३० च्या सुमारास हॉस्टेल बाहेर वाद झाला. त्याचवेळी यादव यांच्यावर हल्ला करण्यात आला.

यादव यांच्या पोटात गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. डॉ. मुकूल यांनी त्यांना जखमी अवस्थेत राज नर्सिंग होममध्ये नेले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव यांच्या वाहनात काही खोकी मिळाली आहेत. वाहनाच्या मागील बाजूसे विटा, दगडं फेकून मारल्याचे दिसते.