बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबतची युती तोडली आहे. मायावती यांनी एकामागोमाग एक ट्विट करत यासंबंधी घोषणा केली आहे. छोट्या, मोठ्या सर्व निवडणुका आपण स्वबळावर लढणार असल्याचं मायावती यांनी जाहीर केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून मायावती यांनी अखिलेश यादव यांच्याप्रती असलेली नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तीन आठवड्यांपुर्वीच मायावती यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत चांगले संबंध ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं.

मायावती यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘समाजवादी पक्षासोबत असणारे सर्व मतभेद बाजूला सारुन तसंच २०१२-१७ दरम्यान समजवादी पक्षाच्या सरकारने घेतलेल्या दलित विरोधी निर्णयाकडे, आरक्षणविरोधात केलेल्या कमांकडे तसंच कायदा सुव्यवस्थेत बिघाड झाला असतानाही फक्त जनहितार्थ आम्ही समाजवादी पक्षासोबत युतीचा धर्म निभावला हे जगजाहीर आहे’.

पुढे केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘लोकसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे आम्ही विचार करण्यास भाग पडलो आहोत की असं केल्याने भाजपाचा पराभव करणं शक्य आहे का ? हे शक्य नाही. यामुळे पक्षाचं हित लक्षात घेता बसपा आगामी सर्व छोट्या-मोठ्या निवडणुका स्वबळावर लढणार’.

रविवारी झालेल्या पक्ष बैठकीदरम्यान मायावती यांनी सांगितलं होतं की, ‘मी मतमोजणीच्या दिवशी अखिलेश यादव यांना फोन केला होता, मात्र त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. यानंतर जेव्हा पक्षाने विधानसभा पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा अखिलेश यादव यांनी बसपा नेते सतीश चंद्र मिश्र यांना बोलावलं, पण माझ्याशी चर्चा केली नाही’.

समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना मायावती यांनी म्हटलं होतं की, ‘१० लोकसभा जागांवर झालेल्या बसपाच्या विजयाचं श्रेय सपा कार्यकर्ते स्वत:ला देत आहेत. पण तसं नसून आम्ही दिलेल्या समर्थनामुळेच सपा पाच जागांवर विजय मिळवू शकली हेच सत्य आहे’. बैठकीदरम्यान मायावती यांनी सपा नेते आणि कार्यकर्त्यांवर दगाबाजी केल्याचा तसंच बसपाचा पराभव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.