केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेच्या सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पात त्यांनी जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षण संस्थांसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय शिक्षण संस्थांची संख्या वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

‘पाच वर्षांपूर्वी जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत (QS World University Rankings) टॉप २००मध्ये भारतातील एकही शिक्षण संस्था नव्हती. पण आता या यादीत आपल्या तीन संस्था आहेत. भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश आहे. याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटींची तरतूद केली आहे,’ असं निर्मला सीतारामन यांनी संसदेत म्हटलं.

Budget 2019: इलेक्ट्रिक कार घेतल्यास दीड लाखांपर्यंत करसवलत

यासोबतच ‘मेक इन इंडिया’प्रमाणे ‘स्टडी इन इंडिया’ ही नवीन योजना राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांना भारतात उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचा यामागचा मूळ हेतू आहे.

भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये जवळपास ५० हजार परदेशातील विद्यार्थी शिक्षण घेतात. ‘स्टडी इन इंडिया’मुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याउलट अमेरिका व इंग्लंडमधल्या शिक्षण संस्थांमध्ये भारतीय विद्यार्थांची संख्या अधिक आहे. २०१७ मध्ये अमेरिकेतल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये २ लाख ४९ हजार ७६३ भारतीय विद्यार्थांनी प्रवेश घेतला होता.