अयोध्येत राम मंदिर उभारावे असे आवाहन करत गुजरात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी मोदींना भाजपने दिलेल्या आश्वासनांवरून चिमटे काढले.
भारताचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विधानसभेतील निरोपासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्रात भाजप आमदारांसह इतर उपस्थित आमदारांनी मोदींचे तोंड भरून कौतुक केले. यामध्ये शंकरसिंह वाघेला यांनीही मोदींची स्तुती केली त्याचबरोबर देशातील जनतेला मोदींनी दिलेल्या आश्वासनांचीही त्यांनी आठवण करून दिली.
वाघेला म्हणाले की, “मोदींजवळ आता बहुमत आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन देशातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत. अयोध्येत राम मंदिर उभारावे. त्याचबरोबर कुख्यात गुंड दाऊदला पकडण्याची मागणीही तुम्ही करत होतात. आता तुम्ही पंतप्रधान होणार आहात त्यामुळे दाऊदला नुसते पकडू नका, तर त्याला भारतात आणा.” असेही वाघेला म्हणाले.
वाघेला यांनी मोदींसोबतच्या संघातील आठवणींनाही यावेळी उजाळा दिला. मोदींची राजकीय वाटचाल यशस्वी राहिली असल्याबद्दल त्यांनी मोदींचे अभिनंदनही केले. तसेच संस्थांवर आर्थिक अनियमिततेच्या आरोप असूनही भाजपकडून पाठराखण मिळालेल्या रामदेवबाबांच्या नेतृत्वाखाली भाजपने परदेशातील काळापैसा भारतात आणण्यावर भर द्यावा. असाही चिमटा वाघेला यांनी मोदींना काढला.
सरकार स्थापन झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत तुम्ही महागाईचा दर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तुमच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत आम्ही कोणताही प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. परंतु, वर्षभरानंतर मोदींनी देशातील महागाई दराबाबत जनतेला समर्थपणे उत्तरे द्यावीत, असेही वाघेला यावेळी म्हणाले.
तसेच केंद्रात यूपीए सरकार असताना गुजरातमधील विकासाची कामे रखडली असल्याची मोदींची तक्रार होती परंतु, आता मोदींकडे एकहाती सत्ता असल्यामुळे गुजरातमधील उर्वरित विकासकामांसाठी पुढाकार घेऊन निधी पुरवावा, असेही वाघेला यांनी मोदींना म्हटले.