ब्रेग्झिटनंतर ब्रिटनचे एकपंचमांश उद्योजक त्यांचे उद्योग दुसऱ्या देशात हलवण्याच्या विचारात आहेत, असे द इन्स्टिटय़ूट ऑफ डायरेक्टर्स या संस्थेने जनमत चाचणीत म्हटले आहे. शुक्रवार व रविवार दरम्यान संस्थेच्या सदस्यांची जनमत चाचणी घेतली असता चारपैकी एक उद्योजकाने कर्मचारी भरती थांबवण्याचे ठरवले आहे. दोनतृतीयांश म्हणजे ६४ टक्के सदस्यांना नकारात्मक परिणाम दिसत असून २३ टक्के उद्योजक सकारात्मक आहेत. ९ टक्क्यांनी काहीच फरक पडणार नाही असे म्हटले आहे. एकतृतीयांश उद्योजकांनी गुंतवणूक कपात करण्याचे ठरवले आहे तर १० पैकी एकाने गुंतवणूक वाढवण्याचे ठरवले आहे.

मजूर पक्षात डागडुजी

मजूर पक्षात श्ॉडो मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी काल राजीनामे दिल्यानंतर विरोधी नेते जेरेमी कोर्बिन यांनी १६ मंत्री नवीन नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज त्यांच्या चार श्ॉडो मंत्र्यांनी राजीनामा दिला तरी त्यांनी आपण मागे हटणार नाही असे स्पष्ट केले. एकूण १६ मंत्र्यांनी राजीनामे दिले असून त्यात श्ॉडो अर्थमंत्री सीमा मल्होत्रा यांचा समावेश आहे. काहींनी राजीनामे दिले याचे दु:ख आहे, पण मी त्यामुळे मागे हटणार नाही, लोकांचा विश्वास तोडणार नाही, ज्या प्रणालीने ब्रिटनला राजकीय व आर्थिक फटके दिले त्याला ब्रेग्झिटने फटका दिला आहे, कारण त्या व्यवस्थेने विषमता तयार झाली होती एवढाच त्याचा संदेश होता. परराष्ट्रमंत्री डायन जॉन्सन, नागरी समुदायमंत्री अ‍ॅना टर्ले, संरक्षणमंत्री टॉबी पर्न्स यांनी राजीनामे दिले आहेत. उद्योगमंत्री अँगेला इगल यांनीही राजीनामा दिला.

कोर्बिन यांच्यावर अविश्वास ठराव

कोर्बिन यांच्यावर अविश्वासाचा ठराव मजूर पक्षाच्या खासदार मार्गारेट हॉज व अ‍ॅन कोफी यांनी मांडला असून त्यावर मंगळवारी गुप्त मतदान होणार आहे.