चीन-भारत यांच्यातील संबंध सीमावादाच्या प्रश्नावरून ताणले गेले आहेत.मागील काही दिवसांपासून दोन्ही देशात लष्करी पातळीवर चर्चा सुरू असताना राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी मोदी सरकारकडे प्रश्न उपस्थित केले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी व नागरिकांच्या माहितीच्या दृष्टीनं काही चिनी अ‍ॅप धोकादायक असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर मोदी सरकारनं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. या बंदीच्या निर्णयावर बोलताना खासदार नुसरत जहाँ म्हणाल्या, “टिकटॉक हे एक मनोरंजन करणार अ‍ॅप आहे. हा एक भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे. धोरणात्मक योजना काय आहे? यामुळे बेरोजगार होणाऱ्या लोकांचं काय? नोटबंदीसारखंच लोक त्रासून जातील. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे, त्यामुळे मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. पण, निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार?,” असा सवाल जहाँ यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

आणखी वाचा- चिनी अ‍ॅपची वकिली करणार नाही, TikTok ची केस घेण्यास मुकुल रोहतगी यांचा नकार

आणखी वाचा- “तिथं मॅप बदललेत, आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे”

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. केंद्र सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलत ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.