न्यायालयातील न्यायमूर्तींविरोधात बंड पुकारणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायाधीश सी.एन. कर्णन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानूसार कर्णन यांना ६ महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्यांना आज अटक करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

कर्णन यांनी सरन्यायाधीश जे.ए.खेहर यांच्यासह न्यायालयीन व्यवस्थाबाबत बंड पुकारले होते. न्यायव्यवस्थेचा अवमान केला असल्याचा आरोप ठेवत सर्वोच्च न्यायालयाने कर्नान यांना ही शिक्षा ठोठावली आहे. न्यायधीश म्हणून कार्यरत असताना अशाप्रकारे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्णन हे पहीलेच न्यायाधीश आहेत.

पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक कर्णन यांना अटक करतील असेही न्यायालयाने सांगितले. कर्णन यांनी काल अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे एस खेहर यांच्यासह आठ न्यायमूर्तींना पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात खेहर यांच्यासह उर्वरित न्यायमूर्तींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या खटल्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

आपल्यावरील आरोप फेटाळत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खेहर आणि अन्य न्यायाधीशांनी न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरु करून आणि माझी वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश देऊन माझा छळ केला होता असे कर्णन म्हणाले. त्यामुळे मी त्यांना दलित अत्याचर प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षे कैद आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावत आहे, असे कर्णन यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांचे हे म्हणणे चुकीचे ठरवत न्यायालयाने कर्णन यांच्यावरील शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.