नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतात असंतोषाचा भडका उडाला. या विधेयकाविरोधातील आंदोलन तीव्र झाल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा फटका खेळाडूंना बसला. गुवाहाटीमधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामना आणि रणजी करंडक क्रिकेट सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ गुरुवारी रद्द करण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने संचारबंदी लागू करण्यात आली. आसाममधील या आंदोलनाचा क्रिकेटवर तर मोठा परिणाम झाला. नागरिकांनी सुरु केलेल्या हिंसक आंदोलनामुळे गुवाहाटीमध्ये सुरु असलेला रणजी सामना अखेरच्या दिवशी थांबवण्यात आला. इतकेच नव्हे, तर हा सामना खेळण्यासाठी आसाममध्ये गेलेला संघ हॉटेलमध्ये अडकून पडला.

रणजी स्पर्धेतील आसाम विरुद्ध सर्व्हिसेस यांच्यातील सामना सुरु असताना नागरिकत्व विधेयकावरून आंदोलन सुरु झाले. सुरक्षेच्या कारणामुळे सामन्यातील अखेरच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. हा सामना खेळण्यासाठी गेलेला सर्व्हिसेसचा संघ एका हॉटेलमध्ये अडकला. या संघाला शहरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण स्थानिक प्रशासनाने अनिश्चितकाळासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत संघाला हॉटेलमधून बाहेर काढणे शक्य होणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर गुरुवारी रात्री होणारा नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध चेन्नईयन एफसी यांच्यातील ‘आयएसएल’चा सामना खेळवण्यात आला नाही. याशिवाय आसाम आणि सेनादल यांच्यातील रणजी सामन्यावरही त्याचा प्रभाव पडला.

‘‘गुवाहाटीमधील रणजी सामना तिसऱ्या दिवसअखेरच्याच धावसंख्येवरच स्थगित करण्यात आला आहे, अशा सूचना आसाम क्रिकेट संघटनेला देण्यात आल्या आहेत. क्रिकेटपटू आणि सामनाधिकाऱ्यांनाही निवास व्यवस्था असलेले हॉटेल सोडू नये, असे सांगण्यात आले आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) महाव्यवस्थापक साबा करीम यांनी सांगितले.