जगभरात गाजलेल्या केंब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणात फेसबुकला पहिला मोठा दणका बसला आहे. ब्रिटनच्या सूचना रेग्युलेटरीकडून फेसबुकला तब्बल $664,000 म्हणजे जवळपास 4.56 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुकने कायद्याचं उल्लंघन केलं आहे, युजर्सच्या खासगी माहितीबाबत त्यांनी पारदर्शकता ठेवली नाही असा ठपका फेसबुकवर ठेवण्यात आला. ब्रिटनचे सूचना आयुक्त एलिजाबेथ डेनम यांनी याबाबत माहिती दिली. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती. या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत आहे. २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलं. केंब्रिज अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप झाला. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचं उघड झालं. या प्रकरणानंतर फेसबुकच्या गोपनीयतेवरच प्रश्न चिन्ह उभं राहिलं. त्यानंतर फेसबुकविरुद्ध #DeleteFacebook ही मोहीम जोर धरून फेसबुक डिलीट करण्य़ाचं आवाहन फेसबुक युजर्सना करण्यात येत होतं.

प्रकरण चिघळल्यानंतर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः या प्रकरणात आणची चुकी झाल्याचं मान्य केलं. त्यांनी स्वतःच्या फेसबुकपेजवर आणि अमेरिकेच्या संसदेतही या प्रकरणी जाहीर माफी मागितली होती. कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने युजर्सचा डेटा लीक केल्याचं समोर आल्यानंतर फेसबुकच्या शेअर्सवर परिणाम झालेला पहायला मिळाला होता. शेअर्स घसरल्याने फेसबुकला जवळपास ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान झाले. तर अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली.