फेसबुक डेटा लिक प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनी आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा करत गाशा गुंडाळला आहे. या कंपनीने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी निवेदन देण्याचीही घोषणा केली आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तीगत डेटा चोरी करून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.

आम्ही आता व्यवसाय करू शकत नाही असे कंपनीने जाहीर केले आहे आणि त्वरित सगळे कामकाज बंद केले आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे. या कंपनीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्याने त्याची चर्चा झाली होती. २०१६ मध्ये या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा जो विजय झाला त्याचे अप्रत्यक्ष श्रेय केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीलाही दिले गेले. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची स्थापना २०१३ मध्ये करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या आधी या कंपनीने सेनेटर टेड क्रूझ यांच्यासाठीही काम केले होते.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लंडन, ब्राझिल आणि मलेशियामध्ये आहेत. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक क्रिस्टोफर वाइली यांनी २०१६ मध्ये या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धती समोर आणल्या होत्या. २०१४ मध्येच वाइली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आणली होती. त्यांच्या दाव्यानुसार ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा बेकायदा पद्धतीने मिळवण्यात आला होता. लिक करण्यात आला होता. या बातमीमुळे इंटरनेट जगतात मोठी खळबळ माजली. आता याच कंपनीने आपले सगळे कामकाज बंद करण्याची घोषणा केली. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या सगळ्या प्रकरणात चौकशी होत असताना फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग यालाही चौकशीला सामोरे जावे लागले. फेसबुक ही कंपनी अनेक प्रकारच्या सेवा पुरवते. त्यामुळे वेगवेगळ्या वर्गातील सेवांच्या संदर्भात वेगवेगळे स्पर्धक आहे. थेट प्रश्न विचारण्यात आला की, मग मक्तेदारी आहे असेच ना, त्यावर ‘नाही असं वाटतंय,’ असे मोघम उत्तर झकरबर्गने दिले… अन्यथा मक्तेदारीच्या संदर्भातील कायद्यांनाही वेगळ्या पद्धतीने सामोरे जावे लागेल याची त्याला पूर्ण कल्पना होती. फेसबुक हे कुणा एकाला पाठिंबा न देता सर्वासाठी समान भूमिका घेणारे किंवा प्रत्यक्षात कोणतीच भूमिका न घेणारे असे (उदासीन) फोरम आहे का, या टेड क्रूझ यांच्या प्रश्नाचा रोख त्याला लगेचच लक्षात आला. म्हणूनच तो म्हणाला, फेसबुक हे अनेकविध प्रकारचे वैविध्य असलेल्या कल्पनांचे व्यासपीठ आहे. त्यात राजकीय काहीही नाही. पण आपल्या सर्वाना हे ठाऊक आहे की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चांगल्या नाहीत. त्या काढायलाच हव्यात. असे उत्तर झकरबर्गने दिले होते.